दलिया इडली
टीप: १) दलिया भिजवल्यावर जर जास्त पाणी उरले तर ते फेकून न देता सांबार बनवायला वापरावे. मी वापरले होते, चवीत फरक पडत नाही. २) या इडल्या अख्ख्या गव्हाच्या असल्याने थोड्या चिकट राहतात व जास्त फुलत नाही. म्हणून पूर्ण वाफ मुरल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात. थंड झाल्या तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो. ३) या इडल्या जरा सालट लागतात. म्हणून शक्यतो या इडल्या फक्त चटणीबरोबर खाऊ नयेत. जोडीला सांबारही बनवावे. ४) डायबेटीस पेशंट्स किंवा ज्यांना तांदूळ न खायचे पथ्य आहे त्यांच्यासाठी न्याहारीचा उत्तम उपाय. ५) यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकतो. ६) माझ्याकडे असलेला इडली स्टॅंड लहान आहे आणि त्यात नऊच इडल्या होतात. तुमच्याकडे जर १२ किंवा १६ कप्प्यांचा स्टॅंड असेल तर एकाच वेळी तुम्ही सर्व इडल्या करू शकता

दलिया इडली
दलिया इडली कशी बनवायची
Daliya idali in marathi
साहित्य :
• १ कप दलिया रवा
• २ कप गरम पाणी
• फोडणीसाठी : १ टेस्पून तेल , २ चिमटी मोहोरी , २ चिमटी हिंग , २ हिरव्या मिरच्या • ४ ते ५ कढीपत्ता पाने , बारीक चिरून • १/२ टिस्पून उडीद डाळ , १/२ टिस्पून चणाडाळ • १ टिस्पून किसलेले आले
• १/२ कप आंबट दही
• चवीपुरते मिठ
• १ टिस्पून इनो सोडा
• इडली स्टँड
• इडल्या वाफवायला इडली कूकर किंवा साधा मोठा कूकर
कृती :
दलिया गरम पाण्यात ४ तास भिजत घालावा . दलिया भिजल्यानंतर त्यातील अधिकचे पाणी काढून ठेवावे , पुर्ण पाणी काढले नाही तरी चालेल . पाणी काढलेला दलिया मिक्सरमध्ये मध्यम वाटून घ्यावा कढल्यात तेल गरम करावे . त्यात आधी डाळी घालून गुलाबी होईस्तोवर परताव्या . • नंतर मोहोरी , हिंग , मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी . हि फोडणी वाटलेल्या दलियामध्ये घालावी . • यामध्ये दही , किसलेले आले आणि मिठ घालून मिक्स करावे . मिश्रण तांदूळाच्या इडलीसाठी जे मिश्रण असते तितपतच दाट असावे . लागल्यास दलिया भिजवून जे पाणी ठेवले होते ते घालावे .. कूकरमध्ये तळाला अडीच ते ३ इंच पातळीपर्यंत पाणी घालावे . गॅस सुरू करावा . इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा . • मिश्रणाचे दोन भाग करावे . एका भागात १/२ टिस्पून सोडा घालावा . मिक्स करून इडली पात्रात भरावे . • कूकरमधील पाण्याला उकळी आली कि इडली स्टँड कूकरमध्ये ठेवावा . वरून झाकण लावावे . साधा कूकर वापरत असाल तर झाकणावरची शिट्टी काढून ठेवावी . • १२ ते १५ मिनीटे वाफवावे . गॅस बंद करून ७-८ मिनीटे वाफ जिरू द्यावी . नंतर इडल्या चमच्याने काढाव्यात . परत कूकरमध्ये पाणी गरम करून वरीलप्रमाणेच इडल्यांची दुसरी बॅच करावी .