आधुनिक पत्रकारितेमध्ये अनेक संधी उपलब्ध: पाटील समारोप सत्रात विविध विषयावर मंथन
सोलापूर

आधुनिक पत्रकारितेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. पत्रकारांनी सामाजिक भान जपले पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक जनजागृतीसाठी परखड आणि धाडसी मत व्यक्त केले पाहिजे , असे विचार साहित्य चपराक पुणेचे संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केले
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रीय संकुल, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक पत्रकारिता : आव्हाने आणि संधी या विषयावरील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा होते. यावेळी विचार मंचावर प्रमुख माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, अपूर्वाई मल्टीमीडियाचे संपादक डॉ. रवींद्र चिंचोळकर,महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, जनसज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोघे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती दिली.आधुनिक पत्रकारितेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत नाविन्यता अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञान उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी पत्रकारितेतील बदल आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांनी वाचन संस्कृती जपली पाहिजे. उत्तम संवादासाठी नवनवे तंत्रज्ञानही आत्मसात केले पाहिजे. असे ते म्हणाले
शेवटी मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अंबादास भासके यांनी केले तर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.