सांबर मसाला रेसिपी
इडली,डोसा,मेदुवडा असे साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की त्याच्याबरोबर आपल्याला चटणी आणि सांबार खायला फार आवडतो. आता सांबर म्हटलं की आपण नेहमी सांबर मसाला विकतच आणतो. पण आज मी तुम्हाला हा सांबर मसाला कसा करायचा याची रेसिपी सांगणार आहे.हा मसाला विकतच्या सांबारमसाल्यापेक्षासुद्धा खूप टेस्टी आहे. मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.
सांबर मसाला रेसिपी
साहित्य:
- अक्खे धणे - १/२ कप
- कढीपत्ता -१/२ कप
- मेथीदाणे -दीड चमचा
- मोहरी-१ चमचा
- काळी मिरी-१/२ चमचा
- उडीद डाळ -२ चमचे
- चणाडाळ-२ चमचे
- जिरे-१/२ चमचा
- हळद- १ चमचा
- हिंग-१/४ चमचा
- काश्मिरी सुखी लाल मिरची-१/२ कप
कृती:
सर्वात प्रथम एका पॅनमध्ये धणे भाजून घ्यावेत. साधारणपणे दीड ते दोन मिनिटे धणे भाजून घ्यावे आणि नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत. नंतर त्या पॅनमध्ये मेथीचे दाणे आणि मोहरी टाकावी आणि दीड ते दोन मिनिटे थोडीशी परतून घ्यावी आणि त्याच बाऊलमध्ये काढून घ्यावी. नंतर त्या पॅनमध्ये चणाडाळ आणि उडीदडाळ दोन मिनिटांपर्यंत परतून घ्यावी आणि बाऊलमध्ये काढून घ्यावे. नंतर त्या पॅनमध्ये जिरे परतून घ्यावे,जिरे परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही . जर जास्त वेळ परतले तर ते जळण्याची शक्यता असते. नंतर जिरे त्या बाऊलमध्ये काढून घ्यावे आणि पॅनमध्ये काश्मिरी सुखी लाल मिरची २ मिनिटे परतून घ्यावी आणि त्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. नंतर दीड ते दोन मिनिटे कडीपत्ता परतून घ्यावा आणि बाऊलमध्ये काढून घ्यावा. अशाप्रकारे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतल्यावर मिक्स करून घ्यावेत. आता त्या बाऊलमध्ये काळी मिरी,हळद आणि हिंग घालावे. आता हे सर्व मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावे. अशाप्रकारे आपला सांबरमसाला तयार.
मी केलेली एक छोटीशी कविता
जेव्हा बनवाल घरच्या घरी सांबर मसाला
बाजारच्या चवीचा विसर पडेल तुम्हाला
फारशी करावी लागणार नाही मेहनत
सर्वच होईल पटपट आणि झटपट
जेव्हा हा सांबर मसाला सर्वांना आवडेल
नाव काढतील लोक त्याचे जो कोणी सांबर बनवेल
महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)
१) सांबर मसाला तयार करतांना सर्व पदार्थ एकत्र भाजले तर चालेल का?
नाही,सांबर मसाला तयार करतांना सर्व पदार्थ एकत्र भाजले तर चालणार नाही कारण काही पदार्थ भाजण्यासाठी कमी तर काहींसाठी जास्त वेळ लागतो. म्हणून सर्व एक एक करून वेगवेगळे भाजून घ्यावे.
२)घरी तयार केलेला सांबर मसाला टिकतो का?
हो नक्कीच ,आपण मसाल्यामध्ये सर्व पदार्थ भाजून घेत असल्यामुळे हा मसाला टिकतो.
तर आज मी तुम्हाला घरच्याघरी सांबर मसाला कसा करावा याची रेसिपी सांगितली मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल. जर तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)