सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 15 January | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 6
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 15 January | Gondavlekar Maharaj Pravachan

नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे.

दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात. पण त्यांतल्या एखादा दारू न प्यालेला असला तर बाकीचे दारुडे त्याला ‘ हा शुद्धीवर नाही ’ असे म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे, आपण सर्वजण विषयांत दंग असल्याकारणाने, जो नामात असतो त्याला आपण ‘ हा शुद्धीवर नाही ’ असे म्हणत असतो. वास्तविक पाहता, ‘ नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही ’ अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो, आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा सत्संगती, आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार. एखाद्या माणसाला म्हटले, की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही, कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच; त्याचप्रमाणे नाम, संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत, त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल, तर त्याचे उत्तर सोपे आहे. असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे ‘ रामनाम. ’ हे यंत्र सर्वांना मिळू शकते, सर्वांना वापरता येते, शिवाय ते कधीच गंजत नाही.

भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत. जिथे नाम आहे तिथे भक्त आहे, आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वांत श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या. नाल्यातून, गटारातून पाणी वाहते, ते किती घाण असते ! पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते. सागर त्या सर्वांना सागररूप करून टाकतो. तसे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असूू द्या, त्याने नाम-नदीची कास धरली की तो रामसागररूप झालाच म्हणून समजा. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. अनाथ शब्द नाथावाचून नाही, आणि नाथाला अनाथावाचून नाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहू या. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दु:खे कस्पटाप्रमाणे वाटतील.

१५. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हांला संत धुंडीत जाण्याची जरूरीच नाही. तेच तुम्हांला धुंडीत येतील.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User