सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 14 January | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 9
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 14 January | Gondavlekar Maharaj Pravachan

नाम घेण्याला काहीही आड येत नाही.

आपण असे पाहू की, नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ, की ते नामच विचाराने, सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून, जरूर तर बळजबरीनेसुद्धा घेत राहणे, हे सुलभ ? समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्र आहेत, आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे. आता एखाद्याने त्यांतले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली, तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल. त्याप्रमाणे, नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्र एकदम फिरू लागून आपले काम निश्चीतपणे आणि सुलभपणे होईल. म्हणून, हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे. नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही. व्यवहारात आपण पाहतोच की, एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्‍चय केला की मनुष्य ती करतोच. मग नाम घेण्याचा जर निश्‍चय केला तर का नाही होणार ? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही; तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे ? म्हणून, कोणत्याही तर्‍हेच्या शंका-कुशंका न घेता, कशाही तर्‍हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम; म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चात्तापाची पाळी येणार नाही.

जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात, आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की, ‘ देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होवो, आणि त्याचीच मला गोडी लागो. ’

प्रह्लाद, द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले ? तेच आपण मागावे, आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते, तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चात्ताप व्हावा. ‘ देवा, मी फार दोषी, अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर. ’ पश्चात्ताप खराच झाला तर राम कृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे, आणि अंत:करणात समाधान ठेवावे.

१४. जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User