पंढरपूर अर्बन बँक घोटाळा: यूपीचे आरोपी निर्दोष सुटले; मग तीन कोटी गेले कुठे
सायबर भामट्यांनी अत्यंत हुशारीने बँकेच्या एटीएम प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेत हा तीन कोटी रुपयांचा डल्ला मारला होता.....
सोलापूर : पंढरपूरची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पंढरपूर अर्बन बँकेतील' तब्बल तीन कोटी रुपयांच्या बहुचर्चित एटीएम सायबर घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता हा घोटाळा मानवी गुन्ह्यापेक्षा तांत्रिक त्रुटी आणि कारणांमुळे घडल्याचे स्पष्ट होत आहे.
15 मार्च 2023 ते 19 मे 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत पंढरपूर अर्बन बँकेच्या 22 एटीएम मशिनमधून अचानक संशयास्पद व्यवहार होण्यास सुरुवात झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर अचानक पैसे गायब झाल्याने बँक प्रशासनात खळबळ उडाली होती. सायबर भामट्यांनी अत्यंत हुशारीने बँकेच्या एटीएम प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेत हा तीन कोटी रुपयांचा डल्ला मारला होता.
उत्तर प्रदेशातून केली अटक
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणाचे धागेधोरे उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले होते. पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले होते. मथुराम निषाद आणि आनंद रामसिंग या दोघांना या सायबर फ्रॉडचे मुख्य सूत्रधार मानत पोलिसांनी त्यांना अटक केली होती आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाचा निर्णय
न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असताना, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करणारे सबळ आणि भक्कम पुरावे सादर करण्यात पोलीस व फिर्यादी पक्षाला अपयश आले. सबळ पुराव्यांचा अभाव असल्याने न्यायालयाने मथुराम निषाद आणि आनंद रामसिंग या दोघांचीही सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी निर्दोष सुटल्याने आता या तीन कोटींच्या घोटाळ्यामागे थेट व्यक्तींचा हात नसून, एटीएम सिस्टीम आणि सॉफ्टवेअरमधील 'तांत्रिक बिघाड' मुख्य कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.
बँकेच्या सायबर सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
दोन्ही आरोपी निर्दोष सुटल्यामुळे बँकेचे तीन कोटी रुपये नेमके कुठे गेले आणि या सायबर गुन्ह्याचा खरा सूत्रधार कोण, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या सायबर सुरक्षेवर आणि तांत्रिक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0

Comments (0)