सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 21 January | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 9
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 21 January | Gondavlekar Maharaj Pravachan

नामाचा अनुभव.

नामाचा अनुभव कोणता ? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये; म्हणजे, नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले, की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे ? ‘ मी कोण आहे ’ हे ओळखायला, जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी, आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्याआत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल.

भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव कमी होते. दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे ? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते, तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादि संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत; जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना ते पटले, ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल  सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो, आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्यांच्यावाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्याओवळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे.

उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळ्या देशांतले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व  सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल. 

२१. नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User