सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 2 January | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 6
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 2 January | Gondavlekar Maharaj Pravachan

नाम सद्गुरूकडून घेणे श्रेयस्कर !

नाम सद्‌गुरूकडून घेणे जरूर आहे, की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल ? वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून, सद्‌गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले नाम ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुद्धा, सद्‌गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच. ते असे की, तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो, आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे, आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून, ‘ मी नामस्मरण करतो ’ अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सद्‌गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते, आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सद्‌गुरूकडून नाम घेणे जरूर आहे. सद्‌गुरुभेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे, कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्‌गुरूची भेट करवून देईल. तसे पाहता, आधी संताची भेट होणे कठीण; आणि समजा भेट झाली, तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही, ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. ‘ खडीसाखर बना’ म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते ? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण, याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सद्‌गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.

आता अशा रीतीने सद्‌गुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की, ‘‘ मी ‘ राम, राम ’ असे म्हणत होतोच, आणि आता सद्‌गुरूने तेच सांगितले; तर मग यात काय मोठे झाले ? ’’ पण यातच विशेष आहे, कारण यात ‘ मी कर्ता ’ हा अभिमान टाकावा लागतो. सद्‌गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव रहात नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा होतो, त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ; जरूर तेवढेच करणे, म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे, हे त्याचे अनुपान समजावे. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.

२. साध्या शब्दांचासुद्धा आधार मोठा असतो. मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User