सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 16 October | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 4
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 16 October | Gondavlekar Maharaj Pravachan

१६ ऑक्टोबर

परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात.

परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वत:चेच नुकसान होते. दुसऱ्याला दु:ख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वत:चे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने, दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंत:करणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावत: आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वत:ला आपला दोष कळणार नाही.

विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक ‘ विठ्ठल विठ्ठल’ म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वत:चा विसर पडेल.

२९०. निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User