सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 4 October | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 4
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 4 October | Gondavlekar Maharaj Pravachan

४ ऑक्टोबर

भगवंताच्या संयोग-वियोगातच खरे सुख दुःख आहे.

हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो, पण आपले स्वत:चे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय साधणार? ज्याला स्वत:ला सुधारता येत नाही, तो दुसऱ्याला काय सुधारणार ? त्यालासुद्धा अभिमानच आड येतो, कारण त्याला वाटते, ‘ आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.’ या अभिमानाने तो फुगलेला असतो. अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाचे पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा त्यांना सांगितले की, ‘ श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ’ तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, ‘ तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ’ तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात ? नामस्मरण हेच साधन म्हणून ते सांगतात. ते दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते; ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे. म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.

जगात खरे सुख नाही आणि दु:खही नाही. जगात सुखदु:ख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे; ते तात्पुरते आहे. खरे सुखदु:ख भगवंताच्या संयोग-वियोगामध्येच आहे. खरे पाहता आपली बुद्धी लवचिक आहे; आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो. म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. आपण त्याचे आहोत, आणि जे जे होते ते त्याच्या इच्छेने होते, असे समजून वागावे. भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये; तसे पोटापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो; याचा अर्थ असा की, मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो, म्हणून या वर्षी पुन: त्याचा जन्म करावा लागला ! खरे म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे. भगवंत काल होता, आज आहे, आणि उद्या राहणारच; म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले, तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल.

२७८. रामनाम जाणा अक्षरे दोन । गुरूमुखे करावी ओळखण ॥

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User