सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 24 December | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 10
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 24 December | Gondavlekar Maharaj Pravachan

अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही.

सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे; आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.

विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये.

पहिल्याने, प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूंचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचे नाम घेतल्याने ते साधते, म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते.

ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीमार्ग असो, खरा ‘ मी ’ कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्यापाशी खोट्या ‘ मी ’ चे प्राबल्य आहे, ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा ‘ मी ’ गेला की खऱ्या ‘ मी ’ ला कुठून आणायची जरुरी नाही, तो प्रत्येकाच्या अंत:करणामध्ये स्वत:सिद्ध आहेच. म्हणून खोट्या ‘ मी ’ ला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्तिमार्गाचे मुख्य साधन आहे. नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायास उत्पन्न होते. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझे सांगणे आहे.

३५९. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User