सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 1 February | Gondavlekar Maharaj Pravachan

#gondavalekarmaharaj #dainikshodh #gondavalekar_maharaj_pravachan_today

0 4
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 1 February | Gondavlekar Maharaj Pravachan

१ फेब्रुवारी

देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम.

आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, “मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.” इथपासून घसरत तो म्हणतो, “मी त्याचा आहे”; आणि अखेर “त्याचा माझा काही संबंध नाही” इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, ‘आमचे स्नेही गेले !’ याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून, त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वत:च्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे समजून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा ‘मी’ आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे ‘मी तोच आहे’ ही भावना होणे. हे कसे साधावे ? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वत:ची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे.

मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीत व्हायला ? म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला ? यालाच ‘साधू होऊन साधूस ओळखावे’, ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’, असे म्हणतात.

३२. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून ‘ मी ’ पण जात नाही.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User